Ad will apear here
Next
देशाला काश्मीरशी जोडणारा बनिहाल बोगदा...
जम्मू-काश्मीरमधील एक भयावह जागा

दुपारी दोन वाजता आमच्या बसने तो बहुचर्चित खुनी आणि शैतानी नाला पार केला. थोड्याच वेळात आम्ही प्रसिद्ध जवाहरलाल बोगद्यापाशी येऊन थांबलो. हा एकमेव बोगदा भारत आणि काश्मीर खोरे यांना जोडतो. या बोगद्यातूनच काश्मीर खोऱ्यात प्रवेश करता येतो. याच बोगद्यावर पाकिस्तानचंही लक्ष असतं.. स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या एका तरुण लेखकाच्या अमरनाथ भटकंतीच्या ‘अमरनाथ ट्रेक’ या ट्रॅव्हलॉगचा हा आठवा भाग...
..................................................
शैतानी नाला परिसर, बनिहाल, काश्मीर‘भुतांनी पछाडलेल्या जागा’ याबद्दलच्या असंख्य कथा-दंतकथा भारतात तसेच जगभरात प्रसिद्ध आहेत. भुताच्या गोष्टी, ‘हॉंटेड’ जागा यांचं वर्णन अनेक लेखकांनी पुरेपूर भयरस ओतून अंगावर शहारे येतील असं केलेलं आहे. त्यापैकी मुंबईतील काही जागा, महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध किल्ले, वाडे, देशभरातील काही हॉटेल्स, त्यामधील विशिष्ट खोली अशी काही बाधित स्थळं असल्याचं अनेकदा मी ही ऐकलं आहे, वाचलं आहे. यातील किती विश्वसनीय आणि किती खोटं हे लेखकांना, त्या त्या स्थळांना आणि तेथील असलेल्या नसलेल्या भुतांनाच माहित.

पण अगदी लेखनातील भीष्माचार्य गो. नि. दांडेकरांनीसुद्धा किल्ले भ्रमंतीवेळी त्यांना आलेले गूढ अनुभव सांगितले आहेत. अभिनेता, लेखक आणि उत्तम ट्रेकर मिलिंद गुणाजीनेही त्यांच्या पुस्तकात महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध स्थळांबद्दल गूढ, अमानवी अनुभव विशद केले आहेत. एकंदर यावर कितपत विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण भ्रमंती करणाऱ्या व्यक्तींना अशा स्थळांबद्दलच्या कथा बऱ्याचदा माहित असतात.

खुनी नालायाचप्रकारे  ‘खुनी नाला’ आणि ‘शैतानी नाला’ अशा दोन विचित्र, गूढ आणि भीतीदायक नावांची स्थळं काश्मीर खोऱ्यात शिरायच्या आधी लागतात. या  जागा बाधित आहेत असं म्हटलं जातं. नवख्या प्रवाशाला या दोन वेगवेगळ्या जागा कळून येत नाहीत. एकाच जागेला ही दोन नावे आहेत, असंही काही लोक  म्हणतात. खुनी नाला, शैतानी नाला हे काही नदी किंवा नाले नाहीत, तर आतून एखादं वाहन जाईल अशा प्रकारचं पुलासारखं असलेलं छोटं बांधकाम आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात याठिकाणी एका इंग्रज अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झाला होता अशी नोंद आहे. तेव्हापासून या जागेला बाधित समजून या जागेबद्दल बऱ्याच कथा-दंतकथा तयार झाल्या आहेत. 

रात्री या भागातून प्रवास करताना, एक तान्हं बाळ जवळ असलेली स्त्री लिफ्ट मागते आणि मग काही अमानवी अनुभव येतात, असं येथील लोक म्हणतात, मानतात. तर खुनी- शैतानी नाला पार करताना त्या मेलेल्या इंग्रज अधिकाऱ्याचं भूत समोरील बांधकाम दृष्टीस पडू देत नाही, दिसणाऱ्याला सरळ रस्ता दिसतो आणि गाडी समोरील पुलावर धडकून अपघाती मृत्यू होतात, अशी एक दंतकथा आहे. पण योगायोग सांगायचा झाल्यास खरोखर या भागात अपघातांचं प्रमाण जास्त असल्याचं निरीक्षण आहे, हे मात्र खरं. 
 
बुद्धीने विचार केल्यास एक कळतं, की खुनी नाला आणि शैतानी नाला या स्थळांची भौगोलिक स्थितीच या अपघातांना कारणीभूत आहे. ही जागा बर्फाच्या त्सुनामीसाठीही ओळखली जाते. बर्फाचे त्सुनामी (हिमस्खलन) या भागात येतात. या बांधकामाला, पुलाला लागूनच डोंगर आहे. त्यामुळे दरडी कोसळणे, हिमस्खलन होणे  हे या भागात नेहमी होत असतं. शिवाय रात्री धुक्यामुळे अनोळखी प्रवाश्याला येथील पुरेपूर माहिती नसल्याने येथे अपघात होतात. शिवाय या भागात कृत्रिम दिवे नाहीत त्यामुळे रात्रीच्या प्रवासात, पावसाळ्यात, हिवाळ्यात दरडी कोसळल्याने, अरुंद जागेमुळे रहदारी खोळंबते आणि यातूनही अपघात होतात. या सगळ्या नकारात्मक भावनेतून खुनी नाला, शैतानी नाला या भुताने बाधीत जागा आहेत. हे भूतबाधित क्षेत्र आहे ही दंतकथा, वदंता निर्माण झाली आहे.

पण तरीही कुठल्याही गोष्टीवर निष्कर्षाचं शिक्कामोर्तब करताना व्यक्तिपरत्वे  अनुभवासाठी एक छोटी पोकळी किंवा जागा रिक्त ठेवावी लागते. ती तशी ठेवायला हवी, कारण अनुभव घेणाऱ्याने तो प्रत्यक्ष घेतला असतो तर इतर फक्त बुद्धी, अंदाज, आणि कोणत्याश्या तंत्राच्या साहाय्याने त्यावर निष्कर्ष काढून एक सोयीस्कर शिक्कामोर्तब करत असतात.

जवाहर (बनिहाल) बोगदा, काश्मीरदुपारी दोन वाजता आमच्या बसने तो बहुचर्चित खुनी आणि शैतानी नाला पार केला. थोड्याच वेळात आम्ही प्रसिद्ध जवाहरलाल बोगद्यापाशी येऊन थांबलो. हा बोगदा भारतातील अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील असा आहे. हा एकमेव बोगदा भारत आणि काश्मीर खोरे यांना जोडतो. या जागेला सामरिकदृष्ट्या, राष्ट्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्व आहे. या बोगद्यातूनच काश्मीर खोऱ्यात प्रवेश करता येतो. याच बोगद्यावर पाकिस्तानचंही लक्ष असतं. कारण इथून पाकिस्तान सीमारेषा अगदी जवळ आहे.

कारगिल युद्धात ‘जवाहरलाल टनेल’वर ताबा मिळवण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला होता. हा बोगदा एकदा नष्ट केला, की भारताचं काश्मीर खोऱ्यात परिवहन बंद होईल, भारतीय सैन्य वाहनाद्वारे काश्मीरमध्ये प्रवेश करू शकणार नाही , परिणामी पाकिस्तानला काश्मीरवर ताबा मिळवणं खूप सहज होईल, यामुळे कारगिल युद्धात या बनिहाल बोगद्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले होते, पण भारतीय सैन्याने संपूर्ण शक्तीनिशी या बोगद्याचं रक्षण केलं. या टनेलला बनिहाल टनेलही म्हणतात कारण बनिहाल नावाच्या टुमदार पर्वतीय आणि भारत आणि काश्मीर खोऱ्याला जोडणाऱ्या सीमेवर वसलेल्या गावात हा बोगदा सुरू होतो.

आजूबाजूला विशाल पर्वत, घरे, हॉटेल्स, दवाखाने, दुकाने, शाळा, मेडिकल स्टोअर्स आणि मोठा बाजार असलेलं हे गाव आहे. पण जितकं सुंदर गाव तितकिच अशांतता येथे नांदते. जणू येथूनच शापित सौंदर्य असलेल्या काश्मीरच्या नंदनवनाची सुरवात होते. येथे बऱ्याचदा आतंकवादी चकमक, अपघात, हिमस्खलन होतात. गावात चुकूनही कुठेही हिंदी भाषेतलं काही आढळत नाही. घरांवरील नावे, दुकानांच्या पाट्या, भिंतीवरील जाहिराती सर्वकाही उर्दू भाषेतच वा क्वचित इंग्रजीमध्ये आढळते.
 
बनिहाल गावाला निरोप देऊन, सैन्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आमच्या बसने बनिहाल बोगद्यात प्रवेश केला. मे २०१७ पर्यंत हा भारतातील सर्वात लांब बोगदा होता. जुना बोगदा असल्याने आतून अरुंद आणि हवा येण्यासाठी योग्य सुविधा नसलेला असा होता. त्यामुळे आत गुदमरायला होतं. शिवाय आत उजेडही नाही. अरुंद असल्याने बऱ्याचदा आत रहदारी ठप्प होते. अशात मग प्रवाश्यांचा जीव घाबरा होतो. आम्ही एकदाचं त्या अंधेरी गुंफेतून बाहेर आलो. बसने एक वळण घेतलं. समोर लिहिलं होतं, ‘वेलकम टू काश्मीर..!’ ‘काश्मीर घाटीचं प्रथम दर्शन करवणारी ही जागा आहे!’ असंही एका मोठ्या शिळेवर लिहिलं होतं. खाली काश्मीर खोरं दिसत होतं. वरून शांत, सुंदर निसर्ग असलेलं काश्मीर खोरं आणि प्रत्यक्षात.... आम्ही काश्मीर मध्ये प्रवेशते झालो. अमरनाथ यात्रेला खरी सुरवात आता होणार होती.
(क्रमशः) 
- अभिजित पानसे
मोबाइल : ८०८७९ २७२२१ 
ई-मेल : abhijeetpanse.1@gmail.com

(‘अमरनाथ ट्रेक’ हा ट्रॅव्हलॉग दर शनिवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/V6rLmU या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZTYBJ
Similar Posts
एक चित्तथराक क्षण माझ्या डावीकडे एका दरीच्या तोंडावर शिळेचा एक उंचवटा होता. त्या दरीतून एक चित्ता वर आला. काही क्षण शिळेवर उभा राहिला आणि वेगाने उडी घेत आमच्या बसकडे झेपावला समोर एक सुमो होती. क्षणात त्याने तिच्या डिकीवर उडी घेतली आणि चपळाईने पलीकडील उंचवट्यावर उडी घेऊन खाली जंगलात शिरला. अप्रतिम आणि चित्तथरारक असं ते दृश्य होतं
उत्सुकता ‘नाशरी टनेल’ची... बस थांबली. समोर ‘वेलकम टू नाशरी टनेल’ असं लिहिलेलं. मी खूप उत्साहात होतो. कारण तीन महिन्यांपूर्वी भारतातील या सर्वांत लांब बोगद्याचं उद्घाटन झालं होतं. आणि आता त्याच टनेलमधून मी जाणार होतो.... स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या एका तरुण लेखकाच्या अमरनाथ भटकंतीच्या ‘अमरनाथ ट्रेक’ या ट्रॅव्हलॉगचा हा सातवा भाग.
..आणि सामान्य माणूसही होतो जिगरबाज सैनिक.. अमरनाथ यात्रा पुढे धार्मिक न राहता ती हळूहळू राष्ट्रीय यात्रा होऊ लागते आणि शेवटी ती फक्त सर्वसामान्य भारतीय माणसाची देशविघातक प्रवृत्तींविरोधी असलेली राष्ट्रीय यात्रा होते. सैनिक शस्त्रानिशी तिथे झुंजत असतातच, पण दरवर्षी आतंकवादी कारवायांना न जुमानता तिथे जाणारा सामान्य माणूसही एक जिगरबाज निःशस्त्र सैनिक होऊन जातो
..आणि माझी अवस्था विक्रमादित्यासारखी झाली मी जर इथेच पहलगामला माझी वजनदार मोठी बॅग ठेवली तर मला पुन्हा याच दूरच्या रस्त्याने परत पहलगामला यावं लागणार होतं. बॅगरूपी वेताळाला पाठीवरून वर गुफेपर्यंत घेऊन जाणं केवळ अशक्य होतं. तसा प्रयत्न जरी केला तरी मृत्यू शंभर टक्के. काय करावं..? माझी अवस्था पाठीवरील वेताळाने प्रश्न विचारल्याने संभ्रमात पडलेल्या विक्रमादित्यासारखी झाली होती

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language